नांदेड :राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने अपमान होत असल्याच्या कारणांवरून महाविकास आघाडीचा आज भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा (MVA Mahamorcha March Mumbai) आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या मोर्चाच्या परवानगीवरून गेल्या दोन दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परंतु मुंबई पोलीसांनी आता परवानगी दिली असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मोर्चासाठी मुंबई पोलीसांचा चोख बंदोबस्त आहे. सीआरपीएफच्या जवानांचा अतिरिक्त फौजफाटा देखील तैनात करण्यात येणार आहे.
मोर्चात सहभागी :पण यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेतेअशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) हे या मोर्चात सहभागी होणार नसल्याची बाब पुढे आली आहे. उध्दव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच दिग्गज नेते या मोर्चाच्या जय्यत तयारीत असतानाच अशोक चव्हाण हे या मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले (not participate at MVA Mahamorcha March Mumbai) आहे.