महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पिके पाण्याखाली..जनावरे गेली वाहून - पुराच्या पाण्यात जनावरे गेली वाहून

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी इसापूर धरणाचा पाणीसाठा 91.76 टक्के झाला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार;
नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार;

By

Published : Sep 8, 2021, 9:52 AM IST

Updated : Sep 8, 2021, 9:58 AM IST


नांदेड- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने मंगळवारी(7 सप्टेंबर) धरणाच्या 12 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गावागावात शिरायला सुरुवात झाली. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांनाही पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा....!


जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर पालकमंत्री अशोक चव्हाण लक्ष ठेवून आहेत. तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूरग्रस्त लोकांपर्यंत सर्वतोपरी मदत पोहोचविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेट देऊन प्रशासनाला सूचना देत आहेत. त्यांनी मंगळवारी देगलूर, लोहा, मुखेड, कंधार, नायगाव, नांदेड, बिलोली तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या खबरदारीच्या आणि मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

मुखेड तालुक्यात शेतकरी वाहून गेला; शोधकार्य सुरू..


मुखेड तालुक्यातील मेथी येथील यादव जळबा हिवराळे हे(52) वाहून गेल्याची घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीने त्यांचे शोधकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मुखेडच्या तहसीलदारांनी दिली आहे. मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व त्यांचा मुलगा संदिप राठोड हे आपल्या चारचाकी वाहनात जात असताना ते दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. ते मुखेड कडे येत होते. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सेवक उद्धव देवकते हा सुखरुप बाहेर पडल्याची माहिती देगलूर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार;
बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले-सोमवारी (6 सप्टें) रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती नदीच्या पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप सुटका करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला....!नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसीलदाराने कळविले आहे.

वीज पडून बैलजोडी ठार, कंधार व बिलोली तालुक्यात जनावरे गेली वाहून-

हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी या शेतकऱ्याच्या दोन बैलांचा ऐन पोळा सणादिवशीच वीज पडून मृत्यू झाला. तर कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून गेली . बिलोली तालुक्यातील सावळी येथे एक गाय, एक वासरू पुरात वाहून गेल्याची नोंद संबंधित तहसील कार्यालयात झाली आहे.

नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन


जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार विजय अवधाने, नायब तहसीलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.


इसापूर धरणात 91.76 टक्के पाणीसाठा, पैनगंगेकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन-

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी इसापूर धरणाचा पाणीसाठा 91.76 टक्के झाला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी केले आहे.

इसापूर धरणाची पाणी पातळी 439.98 मी. एवढी असून इसापूर धरणाचा जलाशय प्रचलन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा (आरओएस) (90 टक्के विश्वासाहर्ता) नुसार 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 440.85 मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्यादृष्टिने इसापूर धरणातून वक्रदारातून कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडवे लागेल. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जगताप यांनी दिली .

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी - जिल्हाधिकारी


जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून अटी व शर्तीनुसार होते. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहिल्याने अथवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे विहिर किंवा शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक6 आहे. पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी.

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबधित कृषि सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करु शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 8, 2021, 9:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details