नांदेड -आरटीओ एजन्टच्या खासगी कार्यालयात तोंडावर रूमाल बांधून आलेल्या दोघांनी गोळीबार करून दहशत माजवली. हा प्रकार सोमवारी रात्री शहरातील बाफना परिसरात घडला. या गोळीबाराच्या घटनेने भयभीत झालेल्या व्यावसायिकाने मंगळवारी सकाळी पोलिसांना पाचारण करून याबाबत माहिती दिली. यामुळे काही केल्या खंडणीबहाद्दरांवर चाप बसत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
शहरातील दशमेशनगर परिसरातील रस्ता क्रमांक १८ वर आरतीया कॉम्प्लेक्समध्ये इंद्रपाल सिंह प्रितम सिंह भाटीया यांचे खासगी कार्यालय आहे. ड्रायव्हिंग स्कूलसह, वाहन परवान्यांसह आरटीओ कार्यालयातून वितरीत होणारे विविध परवाने काढून देण्याचे काम ते करतात. सोमवारी सायंकाळी ते अन्य सहकाऱ्यांसह कार्यालयात बसले असता तोंडावर रूमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंदूकीतून गोळीबार करत दहशत माजवली. यासोबतच ड्रॉवरमधील ५ ते ६ हजार रुपये काढून घेत आरोपींनी उपस्थितांना धमकावत पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने धास्तावलेल्या भाटीया यांनी गोळीबाराची वाच्यता केली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी इतवारा ठाणे गाठून दुकानात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची नोंद केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, इतवारा पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, इतवारा पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा -नांदेड: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट