नांदेड: नांदेडला गोळीबाराची घटना तशी नवी नाही. गावठी पिस्तूल सापडण्याचे प्रमाणही अधिक आहे. जानेवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ता सविता गायकवाड हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने स्वतवर गोळी झाडून दोघांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नांदेडात गोळीबाराची घटना घडली नव्हती. उलट पोलिसांनी अनेकांकडून गावठी पिस्तूल जप्त केले होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्दळीच्या असलेल्या जुना मोंढा परिसरात गोळीबार झाला. सचिन कुलथे राहणार गाडीपुरा हा तरुण शारदा टॉकिज रस्त्यावर उभा होता. दुचाकीवरून आलेल्या गजानन बालाजी मामीलवाड याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे यांच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे ते जागेवर कोसळले.
स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर: यावेळी आरोपी मामीलवाड याने सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले होते. त्यानंतर आरोपी बाप-लेक स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन जखमी कुलथे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी मामीलवाड याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात एकच खळबळ उडाली होती.