नांदेड -नांदेड जिल्ह्यातील तामसामध्ये अज्ञात माथेफिरूने शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास सात वाहनांना आग लावली. यात एक रिक्षा व सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अज्ञात माथेफिरूने जाळली सात वाहने, गुन्हा दाखल - Nanded Crime News
नांदेड जिल्ह्यातील तामसामध्ये अज्ञात माथेफिरूने शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास सात वाहनांना आग लावली. यात एक रिक्षा व सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
रिक्षाचालक गणेश नागोराव शिंदे यांनी शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपली रिक्षा घरासमोर पार्क केली होती. मात्र या रिक्षाला अज्ञात आरोपीकडून रात्री साडेआकराच्या सुमारास आग लावण्यात आली. रिक्षाला आग लागल्याचे लक्षात येताच, गणेश शिंदे यांनी स्थानिकांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रिक्षा जळून खाक झाली. तसेच शहरातील बबलू सय्यद अहमद यांची दुचाकी क्र. एम. एच. २६ ए. जे. ६१२३, गजानन नंदकुमार बंडेवार यांची दुचाकी क्र. एम. एच. २६ ए. एच. २५२, किशोर मुळावकर यांची दुचाकी क्र. एम. एच. २६ एम. २१४५, रमाकांत बंडेवार यांची दुचाकी क्र. एम. एच. २६ ए. ई. ७३६५, नंदकुमार गंगाधर कंठाळे यांची दुचाकी क्र. एम. एच. २६ एस. ४३२२ व अशोक त्र्यंबक लाभशेटवार यांची स्कुटी क्र. एम. एच. २६ बी. के. ५५६९ या गाड्यांना देखील आग लावण्यात आली. यामध्ये वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गणेश शिंदे यांनी तामसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.