नांदेड- जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत सात घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे गावात मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा-पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक काही घराला आग लागली. हळूहळू आग वाढत गेल्याने परिसरातील इतर घरांनाही आगीने विळख्यात घेतले. या आगीत आंदेगावातील सुमारे सात घरे व काही जनावरांचे गोठे जळून खाक झाली.
मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे गावात मोठा गोंधळ उडाला होता. गावकऱ्यांनी हिमायतनगर नगर पंचायतला फोन करुन मदतीची मागणी केली होती. मात्र, तेथून उडवा उडवीची उत्तर मिळल्याने, गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात फोन करुन घटनेची माहिती कळविली. त्यांनतर भोकर येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत संसार उपयोगी वस्तू, रोख रक्कम जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.