नांदेड- उमरी तालुक्यातील एरंडल-येंडाळा, महाटी, कौडगाव येथील वाळू घाटावर क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करण्यात आला होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशावरुन विशेष पथकाने या वाळू घाटांची ईटीएसने मोजणी केली. त्यात तब्बल 12 कोटींची नियमबाह्य वाळू उपसा केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे मंडळ अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी या तिन्ही वाळू घाटाच्या लिलावधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
उमरी तालुक्यातील महाटी या वाळू घाटाचा लिलाव झाला असून हा घाट सोलापूर जिल्ह्यातील दहिगाव (ता.माळशिरस) विष्णू शंकर नारणवार यांना सुटला आहे. त्यांना २८७१ ब्रास वाळू उत्खननाची परवानगी असताना या घाटावर क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करण्यात आला आहे. ईटीएसद्वारे मोजणी केल्यानंतर संबंधितांनी ६३ हजार ३६६ ब्रास इतके जास्तीचे उत्खनन केल्याचे सिद्ध झाले आहे.त्यानुसार त्यांनी २ कोटी ६५ लाख ७९ हजार ७२० रुपयांची वाळू चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एरंडल-येंडाळा हा वाळू घाट मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील ओंकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे यांना सुटला आहे. त्यांना घाटावर २८६२ ब्रास वाळू काढण्याची परवानगी असताना त्यांनी बेकायदेशीररीत्या ११ हजार ९५० ब्रास अधिक वाळू उपसा केला आहे. त्यामुळे त्यांनी ४ कोटी ९६ लाख ९४ हजार ३३९ रुपयांची वाळू चोरी केली आहे. कौडगाव हा घाट नायगावच्या लोकडेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दत्तात्रय बापूराव जाधव यांना सुटला होता. त्यांनी नियमानुसार दिलेल्या ३०९२ ब्रास वाळू ऐवजी १२ हजार ६१६ ब्रास अधिक वाळू उपसा केला आहे.त्यामुळे त्यांनी ५ कोटी २६ लाख ७३ हजार ४७० रुपयांची वाळू चोरी केली आहे.