नांदेड- महाविद्यालयीन तरुणीची चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच छेड काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी छेड काढणाऱ्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन केंद्रे, असे या गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील एका विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने ती रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. ती रूग्णालयात जात असताना भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नितीन केंद्रे यांनी विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानंतर तिचा रस्ता रोखून धरला. तिच्याशी अश्लील चाळे करत उद्धट वर्तन केले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी धाव घेतली.
हेही वाचा -नांदेडमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयासह कोचिंग क्लास बंद ठेवण्याचे आदेश
घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच दमदाटी करत पोलीस व्हॅनमध्ये कोंबून पोलीस ठाण्यापर्यंत आणले. तर दुसरीकडे गुन्हेगार पोलीस कर्मचारी दबंग गॉगल लावून हातात सिगारेट धरून जणू आपण कोणताही गुन्हा केला नाही अशा आविर्भावात उभा होता. विद्यापीठ परिसरात ‘नो स्मोकिंग झोन’ असताना आरोपी पोलीस कर्मचारी हातात सिगारेट धरून उभा होता.
या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकून त्याची धिंड काढावी. त्याला पोलीस विभागातून तत्काळ बडतर्फ करावे आणि विद्यार्थ्यांवर दमदाटी करून मारहाण करणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा -आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे नांदेडमध्ये धिंडवडे; एमपीएससीच्या कार्यक्रमासाठी सुरक्षेविना हजारो विद्यार्थी एकत्र