नांदेड- आठवीत शिकत असलेल्या १४ वर्षांच्या बालिकेवर बापानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना भोकर परिसरातील गावात १ मार्चला घडली. अत्याचाराने भेदरलेल्या पीडितेने हा प्रकार शाळेतील मुख्याध्यापिकेला सांगितल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. दरम्यान त्या नराधम बापाविरुद्ध भोकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवीतील विद्यार्थिनीवर नराधम बापाचा बलात्कार; परिसरात संताप - भोकर
आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बापानेच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना भोकर परिसरातील गावात घडली.
भोकर तालुक्यातील परिसरात पीडिता आपल्या आई वडिलांसह राहते. तिच्या आईची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा फायदा तिचा बाप घेत असे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून पीडितेवर त्याची वाईट नजर होती. तो तिला चुकीच्या पद्घतीने स्पर्शही करत असे. त्यावरून पीडितेच्या आईने त्याला जाबही विचारला होता. मात्र, तो त्याला बधला नाही. १ मार्चला रात्री घरातच या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर तिची आई जागी झाली. आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, चाकूचा धाक दाखवून त्या नराधमाने या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याबद्दल दोघींनाही धमकावले.
जिवाच्या भीतीने दोघीही गप्प बसल्या. मात्र, काही दिवसांनी पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापिकेला सांगितला. तिचे बोलणे ऐकून हादरलेल्या मुख्याध्यापिकेने मुलीच्या आजी-आजोबांना या प्रकाराची कल्पना दिली. आजी-आजोबांच्या मदतीनेच पीडितेने पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.