नांदेड - शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, औषधे आणि खताचा वेळेवर पुरवठा होणार आहे. तसेच बियाणे आणि खतांची कमतरताही भासणार नसल्याचे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज (शुक्रवारी) आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहातील कॅबिनेट हॉल येथे बैठकीत ते बोलत होते. ही बैठक पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
चव्हाण म्हणाले की, मागील वर्षातील पीक विमा मंजूरी बाबत असलेल्या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याबाबत खासदार-आमदार यांनी विविध सूचना केल्या. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महसूल जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची समिती नेमणार आहे. तसेच या संदर्भात सर्व आमदार-खासदार यांच्या सूचना विचारात घेऊन अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत अहवाल सादर करावा. जेणेकरून राज्य शासनामार्फत त्याबाबत आवश्यक निर्णय घेता येईल, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.