नांदेड - जिल्ह्यातील शेतकर्यांचे पैसे थकवलेला परभणी जिल्ह्यातील जय महाराष्ट्र शुगर हा कारखाना परस्पर विक्री झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आपले पैसे मिळविण्यासाठी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातील काचा व साहित्याची तोडफोड केली.
२०१५ या वर्षात परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्यांने शेतकऱ्यांच्या ऊसाचे ४ कोटी २२ लाख रूपये अद्यापही दिले नाहीत. या कारखान्यावर अनेक वेळा जप्तीची कार्यवाही होऊन परभणी जिल्हाधिकारी यांनी लिलावही केला. मात्र, अद्याप शेतकर्यांना पैसे मिळालेले नाहीत. नांदेड, पुणे, मुंबईच्या अनेक तक्रारी शेतकर्यांनी केल्या. तरी ही हाती काहीच लागले नाही. नुकताच हा कारखाना परस्पर विक्री केल्याचे कळले. शेतकऱ्यांच्या एकूण दहा कोटी रकमे पैकी केवळ दोन कोटी रुपये तेही दोन वर्षांत शेतकऱ्यांना देण्याचा निवाडा नॅशनल कंपनी लॉ टर्बुनल ने परस्पर केला. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली व घाबरलेल्या शेतकऱ्यांनी प्रल्हाद इंगोले यांच्याकडे धाव घेऊन 'इंगोले' तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सगळे जण तुमच्या मागे राहू पण आमचे थकलेले पैसे मिळून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.