महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 5, 2019, 10:34 AM IST

ETV Bharat / state

शेतकरी दुहेरी संकटात: ओल्या कापसाला २५ रुपये किलो भाव, कापूस वेचण्यास मजूर मिळेनात

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात आले आहेत. कापूस वेचणीसाठी मजूसुद्धा मिळत नाही आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी दुहेरी संकटात

नांदेड - माहूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कापसाच्या झाडाला फुटलेली बोंडे पाण्यामुळे गळून पडत आहेत. काही ठिकाणी कापसाच्या बोंडाला बुरशी लागत आहे. जमिनीत पाणी असल्याने वेचणीसाठी शेतात मजूर जाऊ शकत नाहीत. फुटलेला कापूस वेचायचा कसा आणि ओला झालेला कापूस वाळवायचा कसा, या विवंचनेने सध्या शेतकऱ्यांना घेरले आहे.

तालुक्यातील अनेक गावांतील शेतात कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे हे पांढरे सोने काळवंडले आहे. हा ओला कापूस शेतकरी बाजारात घेऊन जात आहेत. मात्र, त्यांना भावही मिळत नाही. ओला कापूस २५ रुपये किलो या दराने बाजारात विक्री होत आहे. वेचणीसाठी दोनशे रुपये रोजाने लावलेल्या मजुरांकडून केवळ आठ ते १० किलो कापूस दिवसभरात वेचला जात असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जमिनीत ओलावा असल्याने कापूस वेचणी करणेच दुरापास्त झाले असून फुटलेल्या कापसाची माती होताना दुर्दैवाने शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. गेल्यावर्षी अल्पपावसामुळे पिकांचे सरासरी उत्पादनही मिळाले नाही.

यावर्षी कापूस, सोयाबीन ही दोन्ही पिके चांगल्या स्थितीत होती. मात्र,परतीच्या पावसाने घात केल्याने खरिपाची ही दोन्ही मुख्य पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता रब्बी हंगामातील पेरण्याही होण्याची आशा दुरापस्त असल्याने शेतकऱ्यांसमोर वर्ष कसे काढावे असा प्रश्न पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details