नांदेड -गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे केली जातात. डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मशागतीचा खर्च 25 टक्क्यांनी वाढला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, ही इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
नांदेड जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगरी करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठी देखील टॅक्टरचा वापर होतो. मात्र आता डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
मशागतीसाठी यांत्रिकीकरणावर भर
एक पीक काढले की शेतकरी लगेच दुसऱ्या पिकाची तयारी करत असतो, दरम्यान शेतीची मशागत कमी कालावधीत व्हावी यासाठी मशागतीसाठी शेतकऱ्यांकडून यांत्रिकीकरणावर भर दिला जातो, त्यात ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे भाव वाढल्याने, मशागतीसाठी येणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली आहे, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.