नांदेड - मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकरी नेहमीच विविध संकटाना सामोरे जात आला आहे. परंतु यंदाही त्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याच्याच डोळ्यादेखत वरूण राजाने हिरावून नेला. खरिपाच्या मुग व उडीद या पिकाच्या शेंगा तोडणीला आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पाऊसाने मूग, उडीद, पिकाच्या शेंगांना प्रत्यक्ष मोड (अंकुर) आल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने तत्काळ पिकाची पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा मालेगाव व परिसरात सोयाबीन, मूग , उडीद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आर्थिक अडचणीत तो अगोदरच सापडल होता. दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला. परंतु मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकाच्या शेंगाना प्रत्यक्ष मोड फुटले असल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला असल्याने त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सदर विमा कंपनी व प्रशासनाचे अधिकारी यांनी त्वरित पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.