नांदेड: महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी जुळवाजुळव करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने अन्य पक्षातील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात यावे यासाठी बीआरएसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेससह अन्य पक्षातील अनेक नेते हळूहळू त्यांच्या गळाला लागत आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही काहीसे लांब असणारे शेतकरी नेते व माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे बीआरएसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेलंगणा येथे जाऊन या पक्षाच्या नेत्यांशी प्राथमिक स्वरुपाची चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत दत्ता पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते अशी माहितीही समोर येत आहे.
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणात स्वबळावर आपले साम्राज्य निर्माण केले. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची योजना आखली. यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे. नांदेड येथे केसीआर यांची नुकतीच जंगी सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन घडवले. त्याचवेळी त्यांचे इरादे स्पष्ट झाले होते. पण, केसीआर यांच्यासाठी हा राजकीय मार्ग खडतर असला तरी लढवय्ये आणि शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे केसीआर व त्यांचे मंत्री तसेच आमदार हे नदिड जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चीआरएस पक्ष हा शेतकरी व गोरगरिबांचा पक्ष असल्याचे पटवून देत आहेत. यात त्यांना बर्यापैकी यश देखील आल्याचे मानले जाते.
महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावे नांदेड जिल्ह्यालगत आहेत. दैनंदिन व्यवहारापासून ते रोटी-बेटी व्यवहारापर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणातील विशेषतः नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क आहे. तेलंगणात सत्ताधारी टीआरएस पक्षाच्या वेगवेगळ्या योजनांमुळे तेथील जनतेला कसा फायदा झाला आहे, हे माहित असलेल्या सीमावर्ती भागातील लोकांवरही केसीआर यांच्या कार्यपद्धतींचा प्रभाव आहे. त्यांच्या कामामुळे त्यांनी सीमावर्ती भागात राहणार्या जनतेवर चांगलीच भूरळ पाडली आहे. याचा फायदा मतात रूपांतरीत करण्यासाठी नुकतीच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेल्या बीआरएस पक्षाला कसा फायदा होईल.