नांदेड :सततच्या नापिकीमुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, या चिंतेत नायगाव तालुक्यातील नरंगल येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide by hanging ) केली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. प्रदीप मुकुंद पटेकर वय ३५ असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी प्रदीप यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अवंदाचं पीक तर गेलं, आता रब्बीची तयारी करू, गवत कापा, ट्रॅक्टर लावा असे म्हणत सर्वांना शेतात पाठवले आणि दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात गळफास घेतल्याचे प्रदीप यांचे बंधू प्रवीण पट्टेकर यांनी सांगितले.
पिकांना जगवणे कठीण :जिल्ह्यात १० महिन्यांत जवळपास १२१, तर या चार महिन्यांत ६९ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. प्रदीप यांना चार भावात चार एकर शेती आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्ज मिळाले नाही. उसनवारी करून पेरणी केली. पण नुकसान झाल्याने ते चिंतेत होते. मागील महिन्यात त्यांना बँकेची नोटीस आली. त्यामुळे आणखीच त्यांना मानसिक तणाव आला. प्रदीप यांच्या त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
कर्जामुळे आत्महत्या : कौठा तांडा हे अवघ्या १७०० लोकसंख्येचं गाव. येथील बंडू गणपत राठोड वय ४५ या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. यंदा अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्ण नाहीसे झाले. त्यामुळे आसपास कामही मिळेना म्हणून एक भाऊ हैदराबादला मजुरीसाठी स्थलांतरित झाला. ३ एकरवर लावलेलं कापसाचं पीक पूर्ण गेलं. आता वृद्ध आई-वडील व दोन मुले त्यांच्या पश्चात आहेत. एकीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेचा तगादा आणि दुसरीकडे दैनंदिन उदरनिर्वाह कसा भागवावा हा प्रश्न या कुटुंबासमोर आहे. गावातील बहुतांशी तरुणांना आता तेलंगणात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.