नांदेड - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण भव्य-दिव्य आणि काहीसा हटके व्हावा ही सर्वांची इच्छा असते. अर्धापूर तालुक्यातील एका शेतकरी भावाने आपल्या बहिणीची हेलिकॉप्टरमधून वरात काढून सासरी पाठवणी केली.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या चळवळीसाठी आणि सामूदायिक विवाह सोहळ्यांसाठी ओळखण्यात येते. गावातील बहुतांश लोकसंख्या कदम आडनावाची आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. याच गावाचे सरपंच असलेल्या रामराव बाबुराव कदम यांनी आपल्या बहिणीचा विवाह सोहळा भव्य करण्याचे ठरवले. त्यांची बहीण शिल्पा हिचा विवाह उखळी (ता.औंढा, जि. हिंगोली) येथील मोहन गायकवाड यांच्याशी संपन्न झाला.