नांदेड- लॉकडाऊनमुळे सध्या रोख रक्कमेपेक्षाही अन्नधान्याला जास्त महत्त्व आले आहे. शेतात काम करणारा मजूर वर्ग कामाच्या मोबदल्यात पैशांऐवजी धान्याची मागणी करत आहे. शेतकऱ्यांनादेखील पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आता लॉकडाऊनच्या काळात पुन्हा कामाला आली आहे. आम्हाला रोख रक्कम नको पण कामाच्या मोबदल्यात धान्य द्या, अशी मागणी मजूर करत आहेत.
कामाचे पैसे नकोत, धान्य द्या... जुन्या परंपरेला उजाळा!
रोख रक्कमेसाठी बँकेत जावे लागते आणि बँकेत असलेल्या गर्दीमुळे दिवसभर रांगेत राहावे लागते. त्यापेक्षा कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची प्रथा पुन्हा अस्तित्वात आली आहे.
रोख रक्कमेसाठी बँकेत जावे लागते आणि बँकेत असलेल्या गर्दीमुळे दिवसभर रांगेत राहावे लागते. त्यापेक्षा कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची प्रथा पुन्हा अस्तित्वात आली आहे. कोरोनाचा काळ किती दिवस असेल याची कल्पना कुणालाच नाही. अशा स्थितीत जगण्यासाठी पोटाला लागणारे अन्न धान्य साठवण्यावर मजुरांचा भर आहे. त्यातूनच आता उन्हाळी ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे.
ज्वारी काढणारे मजूर शेतमालकाला पैशांऐवजी धान्याच्या रूपातच मजुरी मागताना दिसत आहेत. कोरोनामुळे कामाच्या मोबदल्यात धान्य, ही जुनीच पद्धत पुन्हा अस्तित्वात आली आहे. पैशांपेक्षा अन्नधान्याच्या उपलब्धतेचे महत्त्व अबाधित राहणार, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.