ईटीव्ही भारत ग्राउंड रिपोर्ट: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; झाडावरच कापसाला फुटले मोड - अतिवृष्टीने कपाशीला मोड
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. परिणामी मराठवाड्यासह, पश्चिम, मध्य महाराष्ट्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी आता सोयाबीन आणि कपाशीला मोड येऊ लागले आहेत.
नांदेड- जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला असून सोयाबीन आणि कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात अनेक शिवारातील वेचणीस आलेल्या कापसाला झाडावरच मोड आल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. या अस्मानी संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जिल्ह्यात चार महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील पाच लाख ६३ हजार ७२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये तीन लाख ६१ हजार १२८ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या 'एनडीआरएफ' च्या निकषानुसार २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या नुकसानीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.