नांदेड - जिल्ह्यात केळी पिकासाठी काही भागात पीक विमा मंजूर झाला तर काही भागात प्रचंड नुकसान होऊनही कुठलीही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. ही माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी समिती नेमली. या समितीसोबत फिरल्यानंतर ज्या हवामान तपासणाऱ्या यंत्राच्या आधारे मापन करून पीकविमा मंजूर होतो. याठिकाणीच अनेक चुका निदर्शनास पाहायला मिळाल्या असून सर्वत्र सावळा गोंधळ दिसून आला. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी नागोराव भांगे पाटील यांनी घेतलेला 'ईटीव्ही भारत' चा ग्राउंड रिपोर्ट....!
ईटीव्ही भारत ग्राउंड रिपोर्ट; विमा कंपनीच्या हवामान मोजणाऱ्या यंत्रणेचा सावळा-गोंधळ......! - नांदेड केळी पीकविमा बातमी
नांदेड जिल्ह्यात समितीने पाहणी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हवामान यंत्र चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहे, असे दिसून येते. सर्वच ठिकाणी आम्ही पंचनामा केला आहे. विमा कंपनीची ही चुकीची यंत्रणा सुधारावी व केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा मंजूर व्हावा यासाठी समितीचा अहवाल पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. इंटनकर यांना सादर करू, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी संभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली.
यातील १९ पैकी दहा मंडळांत विमा मंजूर झाला. तर, नऊ मंडळात विमा नामंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या मरखेल, शेवडी बा. , बरबडा, वसरणी, मालेगाव, भोकर, हदगाव, मनाठा, मुदखेड, मुगट या मंडळात पीक विमा मंजूर झाला आहे. ज्या मंडळात कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी विमा भरल्याची नोंद आहे. त्या मंडळात विमा मंजूर झाला. अर्धापूर, दाभड, बारड आदी मंडळात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी केळीचा पीकविमा काढला होता. अशा ठिकाणी विमा भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सदरील बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी सदरील यंत्रणेला पालकमंत्री चव्हाण यांनी चांगलेच धारेवर धरत चौकशी समिती नेमली. सदरील समितीने शनिवारी अर्धापूर व मुदखेड तालुक्यात प्रत्यक्ष येऊन विमा कंपनीची हवामान यंत्रणेची पाहणी केली असता अनेक चुका पाहायला मिळाल्या.
प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कंपनीच्या यंत्रणेचे पितळ उघडे
जिल्ह्यातील अर्धापूर, मालेगाव, येळेगाव, बारड आदी भागात पाहणी केल्यानंतर कंपनीने हवामान मोजणारी यंत्रणाच चुकीच्या ठिकाणी उभारणी केल्याचे निदर्शनास आले. तांत्रिकदृष्ट्या सदरील यंत्र हे मोकळ्या हवेत असावेत, मोठी वीज वाहिनी नसावी, आजूबाजूला वस्ती व मोठ्या इमारती नसाव्यात, तळे व झाडे नसावीत असा निकष आहे. पण या बाबीची कुठेच खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. सदरील यंत्र हे शासकीय कार्यालयाच्या परिसरात, मोठी झाडे, बाजूला मोठ्या इमारती-भिंती, तळे आदी परिसरातच पाहायला मिळाले. हे यंत्र नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या विमा कंपनीचे आहे आणि ते केळीच्या पीक विम्यासाठी बसवले आहे. असा कुठलाही बोर्ड किंवा सूचना नाही. तसेच साधा संपर्क क्रमांक किंवा पत्ता याचीही नोंद नाही. त्यामुळे गावातीलच नागरिकाला याबाबतीत माहिती नसल्याचे दिसून आले. गावातील ग्रामपंचायत व शेतकरी यांना विमा कंपनीचा नेमका कोण प्रतिनिधी आहे. कंपनी कोणती आहे. याबाबतीत कुठलीच माहिती नाही. त्यामुळे सदरील विमा कंपनीचा हा सावळा गोधळ पुढे आल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले.
शेतकऱ्यांनी कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांना धरले धारेवर...
जिल्ह्यात प्रचंड चुकीच्या पद्धतीने हे यंत्र बसवल्यामुळे चुकीचे मापन झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये विमा कंपन्या लुटत आहेत. यास कंपनीसह कृषी विभाग जबाबदार असल्याचे तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केली. कंपनीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले. तसेच येणाऱ्या काळात सदरील जागा बदलून ज्या ठिकाणी शासकीय निकषाप्रमाणे प्रमाणे यंत्रणा बसविण्यात यावे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणा किंवा शेतकरी असावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
समितीचा अहवाल पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना सादर करणार - बाळासाहेब रावणगावकर
नांदेड जिल्ह्यात समितीने पाहणी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हवामान यंत्र चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहे, असे दिसून येते. सर्वच ठिकाणी आम्ही पंचनामा केला आहे. विमा कंपनीची ही चुकीची यंत्रणा सुधारावी व केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा मंजूर व्हावा यासाठी समितीचा अहवाल पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. इंटनकर यांना सादर करू अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी संभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, परभणी कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे के.के.डाखोरे, संजय मोरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जि.प.सदस्य बबनराव बारसे, सुनिल अटकोरे, संतोष गव्हाणे, हनुमंत राजेगोरे, बालाजीराव गव्हाणे, सभापती प्रतिनिधी अशोक सावंत, केशवराव पाटील, सुनिल अटकोरे, नीळकंठ मदने, ईश्वर पाटील इंगोले, अवधूत कदम, रंगनाथ इंगोले, बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक शेतकरी, कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.