नांदेड - सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी नात्यातील लोकच एकमेकांविरोधात निवडणुक लढवत आहेत. त्यामुळे मित्रत्व व सोयरपणात दरी पडली आहे. सख्खे भाऊ, काका पुतण्या, सासू सुनेच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळते आहे.
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी: काका-पुतण्या तर सासू-सुनांचा एकमेकांविरोधात शड्डू - nanded grampchayat news
नांदेडमध्ये काही ठिकाणी नात्यातील लोकच एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मित्रत्व व सोयरपणात दरी पडली आहे. सख्खे भाऊ, काका पुतण्या, सासू सुनेच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळते आहे.
दाभडमध्ये सासू-सून विरोधात....!
अर्धापुर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. सासूबाई रेखा दादजवार यांच्या विरोधात सुनबाई संगीता निवडणूक मैदानात उतरलीय. त्यामुळे दाभड ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरलीय. विशेष म्हणजे मागच्या टर्ममध्ये या दोघींनी अडीच-अडीच वर्षे सरपंच पद भूषवले होते. आता पुन्हा संधी मिळाली तर काम करण्याची इच्छा असल्याचे सुनबाईने सांगितले. तर सासूबाई सध्या कामानिमित्त पुण्याला गेलेल्या असल्या तरी त्यांचाही प्रचार जोरात सुरू आहे. सासू-सुनेच्या या लढाईत कोण वरचढ ठरत ते निवडणूक निकालातच ठरणार आहे.
आंबेगावमध्ये काका-पुतण्या विरोधात
अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल उतरल्याने रंगत आलीय. विशेष म्हणजे या गावात काका विरोधात पुतण्या आणि सुनेविरोधात सासरे निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आंबेगावची ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्यात चर्चेत आलीय. पूर्वी या गावावर काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र आता काँग्रेसमध्ये दोन गट पडले. तर युवा शक्ती ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमोल डोंगरे यांनी सर्व जागेवर उमेदवार उभे केले. त्यामुळे आंबेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालीय.