महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाव नसल्याने शेतकऱ्याने केळीची बागच टाकली कापून; अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचा संताप - शेतिविषयक बातम्या

केळी पिकांवर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकऱ्याचा लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. यामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील केळीच्या दीड हजार रोपे तोडून टाकली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Sep 26, 2021, 3:56 AM IST

Updated : Sep 26, 2021, 6:24 AM IST

नांदेड - अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यातच आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवरही करपा रोग आल्यामुळे केळीचा भाव मातीमोल झाला आहे. लाखोंचे नुकसान सहन होत नसल्याने देळूब (बु.) येथील एका तरूण शेतकऱ्याने शेतातील दीड हजार केळीची उभी झाडे कापून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे.

भाव नसल्याने शेतकऱ्याने केळीची बागच टाकली कापून

केळी लागवडीचा खर्चही निघेना

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या टाळेबंदीच्या काळात विविध पिके संकटात सापडली आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके संकटात सापडली आहेत. सध्या केळी पिकाला करपा रोगाने ग्रासले आहे. त्यातच कोसळलेले भावामुळे केळी पिकाचा लागवड खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. परिणामी केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

दीड हजार केळीची झाडे कोयत्याने कापून केली भुईसपाट

अर्धापूर तालुक्यातील सर्वच भागात काढणीला आलेल्या केळीच्या संपूर्ण बागा शेतात पिकून उधवस्त होत आहेत. तर उर्वरित केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावरील केळीचे पीक कोयत्याने तोडून भुईसपाट केले आहे. या प्रकारामुळे हतबल झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थिक मदतीची अपेक्षा आहे. मात्र, शासन या शेतकऱ्यांना मदत देईल का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कोरोनावर लस मग पिकांच्या रोगावर औषध का नाही

दीड हजार केळींच्या रोपांसाठी एक लाख रुपयांचा लागवड खर्च झाला आहे. सुमारे तीन लाख रुपयांच्या उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे केळी पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने लागवड खर्चही निघत नाही. यामुळे केळीची सर्व रोपे कापल्याचे शैलेश लोमटे यांनी सांगितले. तसेच सरकार कोरोनावर लस काढते तर पंचवीस वर्षांपासून असलेल्या या करपा रोगावरील औषधाचा शोध आजपर्यंत का लागला नाही, असा सवाल लोमटे यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही - हनुमंत राजेगोरे

नांदेड, अर्धापूर, मुदखेड व भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. पण, सद्यस्थितीत केळी उत्पादक शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. विशेष म्हणजे हे सर्व तालुके पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी केळी पिकाच्या अडचणी संदर्भात पालकमंत्री यांना भेटीसाठी वेळ मागतली. पण, चार महिन्यांत शेतकऱ्यांची अडचण ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री आपला वेळ देऊ शकले नाहीत. पालकमंत्र्यांकडे गुत्तेदारांसोबत बैठक घ्यायला वेळ आहे. पण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कराल येणाऱ्या काळातही हाच शेतकरी शांत बसणार नाही हे लक्ष्यात असू द्या, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दिला आहे.

हेही वाचा -UPSC : पहिल्याच प्रयत्नात नांदेडच्या सुमितकुमारची घोडदौड, 660 वी रँक

Last Updated : Sep 26, 2021, 6:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details