नांदेड - रोहिणी, मृग, आद्रा, पूनर्वसू आणि स्वाती ही नक्षत्र आणि पावसाळ्याचे तब्बल २ महिने कोरडे गेल्याने पाणीटंचाई आणि दुष्काळाची छाया अधिक गडद होत आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या धरणे-प्रकल्पांनी अगोदरच तळ गाठलेला आहे. या प्रकल्प क्षेत्रातही पाऊस झालेला नसल्याने ही धरणे भरण्याची शक्यताही दुरावली आहे. पहिली पेरणी, कुठे दुबार पेरणी तर, कुठे तिबार पेरणी करून पिके उगवलीच नाहीत. काही ठिकाणी उगवलेली पिके उन्हामुळे कोमेजून जात आहेत. त्यामुळे खरीप हंगाम हातातून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत गेली. परंतु, नांदेड शहराला आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा यावर्षी एवढ्या मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात शहरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. १९८८ पासून आतापर्यंत नांदेड शहराला पाण्याची टंचाई भासली नाही. यावर्षी तर पावसाळ्याचे २ महिने संपले तरी आतापर्यंत पाऊस झालेला नाही, यामुळे भविष्यात शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत जेमतेम ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विष्णुपुरीतील उपयुक्त साठा निरंक असून प्रकल्पात गाळासह अवघा पाच दलघमी पाणीसाठा आहे.
शेतातील पिकांना सोडा इंथ माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेना! शहराला दररोज ०.७० दलघमी पाणी लागते. त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. नेमके पाणी येण्याच्या दिवशी तांत्रिक अडचण निर्माण होऊन पाणी आले नाही. तर, मात्र लोकांना पाण्याचे हंडे घेऊन मिळेल त्या ठिकाणी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सध्या शहराला २२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापैकी १२ टँकर महापालिकेचे आहेत. तर १० खासगी टँकर आहेत. शहरातील नवीन वसाहतीमधील बहुतेक अपार्टमेंटची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. या अपार्टमेंटमध्ये एका कुटुंबाला दरमहा सरासरी एक ते दीड हजार रुपये खर्च येत आहे.
नांदेड शहराच्या उत्तर भागात इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा पुरवठा सध्या करण्यात येतो. यावर्षी इसापूर धरण क्षेत्रातही कमी पाऊस झाल्याने भविष्यात या भागालाही टंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. नांदेड तालुक्यातील काही भाग याशिवाय मुदखेड, अर्धापूर, भोकर, हदगाव, उमरी या तालुक्यांच्या काही भागात इसापूर धरणातील पाण्यावर बागायती शेती अवलंबून आहे. इसापूर धरणात पाणी नसल्याने या भागातही भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. जिथे पिण्यासाठीच पाणी मिळणार नाही, तेथे रब्बीसाठी पाणी म्हणजे दिवास्वप्नच ठरेल. जिल्ह्यात जेमतेम ६६ टक्के खरीप क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणी पावसाअभावी खोळंबली आहे. पावसाळ्याचे ४५ दिवस संपले असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत पुढील दहा महिने कसे काढायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांनाच नाही तर प्रशासनालाही पडला आहे.