नांदेड -जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा भडीमार झाल्यानंतर त्यावर झालेली सुनावणीही गाजली होती. या प्रक्रियेनंतरही संस्था प्रतिनिधीची मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची धावपळ सुरू असताना बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून त्यात पात्र ठरलेल्या ८२ संस्था प्रतिनिधींच्या नावाची भर पडली आहे. प्रारुष मतदार यादीत संस्था प्रतिनिधीची संख्या ८५८ होती. ही संस्था वाढून ९४० झाली असून सुनावणीच्या वेळेस थकबाकीदार सेवा सोसायट्यांनी संस्था प्रतिनिधी म्हणून ज्यांना पाठवले, त्यांनी संस्थेची थकीत रक्कम भरल्याने त्यांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट झाली आहे.
काही संस्था न्यायालयात गेल्याने होऊ शकते वाढ
काही सेवा सोसायट्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुढे त्यांच्याही नावाचा समावेश होण्याची शक्यता असल्याने अंतिम मतदाराचा आकडा वाढू शकतो, असे सांगण्यात आले. जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीला अंतिम स्वरुप प्राप्त होण्यापूर्वीच अनेक अपात्र किंवा थकबाकीदार सेवा सोसायट्यांनी उच्च न्यायालय गाठले असले तरी सहकार सहनिबंधकांनी मतदारयादी अंतिम करून या यादीला प्रसिद्धी दिली आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये ८२ सभासदांची वाढ झाली असून असे अंतिम मतदारयादीत या सभासदांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी थकीत रक्कम भरली किंवा ज्यांच्याविरूद्ध आलेले आक्षेप फेटाळण्यात आले, अशा सभासदांचे नाव अंतिम मतदारयादीत झळकले आहे. सर्वाधिक मतदारांची वाढीव नोंद संस्था मतदारसंघात झाली आहे.