नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा इथल्या राजकारणात भाऊ आणि बहिणीत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. भाजपचे खासदार असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांचे भाऊजी श्यामसुंदर शिंदे हे लोहा कंधारचे आमदार आहेत. काल शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार पत्नी आशा शिंदे यांनी आपल्या खासदार भावावर तोंडसुख घेतले तर खासदारांनी देखील आमदार असलेल्या आपल्या भावजीवर टीका केली आहे. कुटुंबातला हा वाद आता चव्हाट्यावर आला असून त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
श्रेयवादासाठी आरोप प्रत्यारोप : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १७ रोजी नियोजित स्थळी नेताना माळेगाव येथून खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते पुतळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात होणार होती. मात्र आमदार श्यामसुंदर शिंदे, आशा शिंदे यांनी प्रथम पूजा करून स्वागत केले. यावरून पुन्हा श्रेयवाद सुरू झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बहिण आशा शिंदे व भाऊ खासदार चिखलीकर यांचा शाब्दिक वाद थांबला.
लोकांच्या भुवया उंचावल्या :माळाकोळी येथे खासदार-आमदार समर्थक स्वागतासाठी थांबले असता आमदार शिंदे यांनी पूजेदरम्यान आपन दंड थोपटलेले पाहून येथे जमलेल्या लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही दंड थोपटू मी देखील तयार असल्याचा एक प्रकारे इशारा दिला. दरम्यान आशा शिंदे यांनी खासदार चिखलीकर यांच्या उपस्थितीत भाषण करतान त्यांचे वाभाडे काढले, स्त्रियांची इज्जत करा असा सल्ला देखील शिंदे यांनी खासदारांना देत वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.