नांदेड -आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरूपती बालाजी देवस्थानचे जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात. तिरूपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी, अशी मागणी भाविकांची होती. यासाठी मोठे प्रयत्नही करण्यात आले. या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड - तिरूपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
नांदेड विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा
नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरूपतीची भर पडली आहे. नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती.
'या' दिवशी विमानसेवा
यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी टुजेट विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली होती. त्याचीच फलश्रृती म्हणून सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई - कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.
इतके असणारे किमान भाडे
तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई - कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले. भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.