नांदेड - धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा, या आरक्षणाच्या मागणीसाठी लोहा तहसील कार्यालयासमोर आज (मंगळवार) ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजातील सत्तर वर्षीय व्यक्तींच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देत आरक्षणाची मागणी करण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी धनगर आंदोलन होत आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी लोहामध्ये आंदोलन करत वृद्ध व्यक्तींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. लोहा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.