नांदेड- 'प्रतापराव पाटील तुम्ही दिल्लीत पोहोचलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची मन जिंकली, आता दिल्लीही जिंकाल. अजून तुम्हाला मोठी उंची गाठायची आहे,' असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीव्यक्त केला. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर केंद्रीय मंत्री होतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही वाचा-शरद पवारांची भुमिका दुटप्पी, त्यांनी संसदेत 'ही' मागणी का केली नाही?
प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत बलाढ्य नेत्याला पराभूत करून चिखलीकर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली. त्यामुळे निश्चित दिल्लीत तुमचे नेतृत्व सिद्ध झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना चिखलीकर म्हणाले की, 'संघर्ष केल्याशिवाय मला काहीही मिळाले नाही. संघर्ष करत मी येथे पोहोचलो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला लोकसभा लढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार मी लढलो आणि जिंकलो. मी आतापर्यंत चार वेळा पक्ष बदलला. प्रत्येक वेळी जिंकलो. फडणवीस यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. लोकसभेचा उमेदवार कोणीही द्या त्याला निवडून आणू, असा विश्वास दिला आणि फडणवीस यांनी मला निवडणूक लढण्यासाठी सांगितले. हा विश्वास नांदेडच्या मतदारांनी सार्थ ठरविला आहे.'
'माझ्या घरी अथवा कार्यालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांना फराळाची सोय केली. पण माझे कार्यालय बांधताना काही जणांनी या बांधकामाला परवानगी कशी दिली यावरून प्रश्न उपस्थित केले. मी कुणाचीही एक गुंठा सुद्धा जमीन हडप केली नाही. बाकीच्या लोकांनी नांदेडमध्ये किती जमीन हडपली हे तुम्हाला माहीत आहे.'असेही चिखलीकर म्हणाले.
यावेळी माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी खासदार डी. बी. पाटील, माजी मंत्री पाटील, गणेश हाके, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती होती.