महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही'; ब्लड कॅन्सरशी दोन हात करत 'त्याने' दहावीत मिळवले ७० टक्के गुण

रवीवर मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयात उपचार सुरू असल्याने मागील वर्षी रवीला दहावीची परीक्षा देता आली नव्हती. शिक्षणात एक वर्षाचा खंड असतानाही त्याने हे यश संपादन केले आहे.

गंधनवाड परिवार

By

Published : Jun 12, 2019, 1:55 PM IST

नांदेड - अर्धापूर येथील बसवेश्वर विद्यालयाच्या रवी गंधनवाड या विद्यार्थ्यांने ब्लड कॅन्सरशी दोन हात करत दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवले आहेत. वशेष म्हणजे तीने कोणतीही शिकवणी लावलेली नव्हती.

रवीवर मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयात उपचार सुरू असल्याने मागील वर्षी रवीला दहावीची परीक्षा देता आली नव्हती. शिक्षणात एक वर्षाचा खंड असतानाही त्याने हे यश संपादन केले आहे. त्याला चालू शैक्षणिक वर्षात दर २ महिन्याला उपचारासाठी मुंबईला जावे लागत होते. उपचार आणि अभ्यास यात सातत्य ठेवून एकीकडे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारवर मात करत दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या दोन्ही लढाई जिंकण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

अर्धापूर शहरातील रामननगर मध्ये राहणारा रवी अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या रवीला नववीत असताना २०१७ मध्ये ब्लड कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. हा गंधनवाड कुटुंबाला मोठा धक्का होता. हा धक्का सावरत त्यांने उपचार सुरू केला.

दहावीच्या परीक्षेच्या यशाबाबत माहिती देताना रवी गंधनवाड

रवीला उपचारासाठी ८ महिने मुंबईत राहावे लागल्यामुळे २०१७ मध्ये त्याला दहावीचा अभ्यास करता आला नाही. त्यामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. त्यानंतर त्याने आजाराला धैर्याने सामोरे जात जून २०१८ मध्ये पुन्हा जोमाने दहावीचा अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे अभ्यासक्रम बदलेला असतांनाही अभ्यासात सातत्य ठेवत चांगल्या यशासाठी धडपड सुरूच ठेवली. चालू शैक्षणिक वर्षात दर २ महिन्याला उपचारासाठी मुंबईला जात होता. तसाच तो अभ्यासही करत होता. घरातील परीस्थिती जेमतेमच असल्यामुळे वैद्यकीय खर्च आणि शैक्षणिक खर्च परवडत नसल्यामुळे खासगी शिकवण्या लावता आल्या नाहीत. कधी आजारही वाढायचा अशा प्रतिकूल परीस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याच्या संर्घषाला यश आल्याने शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.

जीवन हे संघर्षाने भरले आहे. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता त्याच्याशी २ हात केल्यास यश संपादन करता येते. मी आजाराशी लढत अभ्यासात सातत्य ठेवत यश संपादन केले आहे. मी जीवनातील प्रत्येक परीक्षेचा पेपर धैर्याने सोडविण्याचा निर्धार केला असून पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. या संघर्षात माझे आई वडील, बंधू यांचे सहकार्य मिळाले. भविष्यात मला प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे, अशी इच्छा रवीने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details