नांदेड - संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. एकूण बारा उमेदवार रिंगणात असून भाजपा, काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत होत आहे. सकाळ पासून अनेक ठिकाणी मतदारानी रांगा लावल्या आहेत.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान कॉंग्रेसचे या भागातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे येथील पोटनिवडणुक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून सुभाष साबणे व वंचितकडून उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान मतदान असल्यामुळे या भागात सर्व कार्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे.
..या आहेत देगलूर-बिलोली मतदारसंघातील समस्या
देगलूर-बिलोली मतदारसंघात मागच्या तीन दशकांपासून सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. देगलूर येथील लेंडी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्हीही तालुक्यातील शेती आणि अनेक गावांना पाणी मिळणार आहे. करडखेड तलावाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. या मतदारसंघात दोन्ही तालुक्यात एमआयडीसी विकसित झालेली नाही, त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही.
हेही वाचा -काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनामुळे निधन