नांदेड- अर्धापूर शहरातील मारोती मंदिर परिसराजवळ पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने साखरेच्या गाठी, हार, कंगण तयार करणारा कारखाना सुरू आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे साखरेचे दर वाढले. गाठी तयार करण्यासाठी लागणारा साहित्याचा खर्च, मजुरांचा खर्च आणि उत्पादनात येणारा तोटा, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे साखरेच्या गाठी तयार करण्याचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथील हार, कंकण आणि साखरेच्या गाठी बनविण्याचा व्यवसायदेखील प्रसिद्ध आहे. येथील साखरेच्या गाठी म्हेसा, नांदेड, बाळापूर, वसमत व अर्धापूर तालुक्यात विक्रीसाठी जातात. हा व्यवसाय पारंपरिक असून पिढ्यानपिढ्या चालत आहे. महाशिवरात्री, होळी सणापासून ते गुढीपाडव्यापर्यंत साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी कुटुंबासह मजूर राबत आहेत. मात्र, या व्यवसायाला गेल्या ५ वर्षांपासून महागाईची झळ बसत गेल्याने उतरती कळा लागली.
वाढत्या महागाईमुळे साखरेच्या किंमती वाढत गेल्या. त्याला लागणारे साहित्य साखर, हाड्रोलिक पावडर, तुरटी, दूध, लाकूड, कोळसा, मजुरांवरील खर्च वाढत गेला. मात्र, उत्पादन केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न घटत गेले. साखरेच्या गाठी तयार करणारा कारखाना चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. साखरेच्या गाठी महागाईमुळे अधिकच कडू होऊ लागल्या. शेवटी महागाईमुळे हा व्यवसाय करणे परवडत नाही. आता साखरेच्या गाठी, हार, कंगण शहरात विक्रीसाठी येत असून ते नाजूक असल्याने जास्त प्रमाणात चुरा होऊन नुकसान होत आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.