नांदेड - फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मधुमेही रुग्णांमध्ये आढळून येणारा म्यूकरमायकोसीस हा आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आव्हान ठरला आहे. नांदेडमध्ये सद्यस्थितीत म्यूकरमायकोसीसचे अंदाजे ५० ते ६० रुग्ण आढळून आले असून तीव्रता कमी आहे. नांदेडमध्ये म्यूकरमायकोसीसचे रुग्ण कमी असून गंभीर रुग्णांना ऑपरेशनसाठी औरंगाबाद, हैदराबाद, लातूर, पुणे येथे पाठवले जात आहे.
नांदेडमध्ये म्यूकरमायकोसीसची तीव्रता कमी, आतापर्यंत आढळले 50 ते 60 रुग्ण कोविड उपचारादरम्यान भरमसाठ औषधांमुळे साईड इफेक्ट
कोविड उपचारादरम्यान होणारा स्टिरॉइड्स, जंतुनाशक औषधे, रेमडेसिवीर या औषधांचा भरमसाठ वापर व त्यामुळे शरीरावर होणारा वाईट परिणाम म्हणून रुग्णांमधील रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या बाबी घडतात. असे रुग्ण मग म्यूकरमायकोसीस या संधीसाधू बुरशीजन्य आजाराने ग्रासू लागलेले चित्र सगळीकडे दिसत होते.
राज्यात म्यूकरमायकोसीसच्या रुग्णांची भर!
महाराष्ट्रभर म्युकरमायकोसीस रुग्ण आढळून येत आहेत. नांदेडमध्ये सद्यस्थितीत म्यूकरमायकोसीसचे अंदाजे ५०-६० रुग्ण आढळून आले आहेत. सध्या तरी दिलासादायक स्थिती असून कोविड झाल्यानंतर सर्व रुग्ण प्राथमिक तपासणीसाठी दात आणि डोळ्यांच्या दवाखान्यात येत आहेत. तसेच स्वतःही चांगली काळजी घेत आहेत. कोविडची स्थिती सध्या आटोक्यात असून म्यूकरमायकोसीसने भीषणता वाढण्याअगोदरच तीव्रता कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनानेही या आजाराच्या उपचारासाठी महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. अशी प्रतिक्रिया दंतरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली माने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रुग्ण सजग
सर्वप्रकारच्या सामाजमाध्यमांमधून म्यूकरमायकोसीसआजाराबद्दल होणारी जनजागृती त्यामुळे रुग्ण आजाराबद्दल सजग झालेत. प्राथमिक स्वरुपात काही लक्षणे आढळून आली की, लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. या सकारात्मक बाबी कोरोनाच्या ओसरत्या लाटेबरोबर जाणवत आहे. जन-माणसांमध्ये या आजाराबद्दल जागृती तर झालीच, मात्र, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम करणे, प्राणायाम करणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, तणावमुक्त राहणे, यासाठी प्रयत्न करत असलेले एक सुखद चित्रही दिसत आहे.
काय आहे म्यूकरमायकोसीस
हे एक फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य आजार) असून तो प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा अतिशय दुर्मीळ असा आजार आहे. ज्याला ब्लॅक फंगस असेही म्हटले जाते. हा संसर्गजन्य म्हणजे एकापासून दुसऱ्याला लागण करणारा आजार नाही. डायबेटीस, उच्च रक्तदाब, किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना याचा सर्वाधीक धोका असतो. हा बुरशीजन्य आजार श्वासाद्वारे नेझल, पॅरानेझल सायनस व फुफ्फुसांत प्रवेश करतो, तसेच जखमांमधूनही शरीरात प्रवेश करतो. सायनस कॅविटीमधल्या लायनिंग्जला सूज येणे ज्याला आपण सायनुसायटीस असे म्हणतो, इथे सुरुवात होते. हे फंगल इन्फेक्शन रक्तपुरवठा जास्त असलेल्या भागांमध्ये लवकर पसरते, रक्तवाहिन्या ब्लॉक करते, ज्यामुळे हाडाचे नेक्रोसिस होऊन हाड निर्जीव बनते.
- लक्षणे
● तोंडाच्या एका बाजूला सूज येणे.
● हिरड्यांमधून रक्त/पू (पस) येणे.
● अचानक दात हालायला लागणे.
● जबड्याचे हाड उघडे पडणे.
● डोके दुखणे.
● डोळ्यांवर सूज येणे.
● डोळ्यांची हालचाल कमी होणे.
● चेहऱ्याची त्वचा काळी पडणे.
● सायनसमध्ये रक्तसंचय होणे.
● नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.
● कानांमध्ये डल पेन होणे.
● डोळ्यांची दृष्टी कमी होणे/ अंधत्व येणे.
निदान/तपासण्या
प्राथमिक पातळीवर या आजाराचे जेवढे लवकर निदान होईल, तेवढे आपण लवकर उपचार सुरू करून रुग्णाच्या जीविताची हमी देऊ शकतो.
● सिटी स्कॅन- सिटी पिएनएस, सिटी ऑर्बिट, सिटी ब्रेन, इत्यादी
● इंडोस्कोपी/बायोप्सी.
● फंगल कल्चर, एग्झामिनेशन - केओएच, इत्यादी तपासण्या करून तात्काळ निदान करणे.
उपचारपद्धती
● लवकरात लवकर निदान करून ॲन्टिफंगल थेरेपी सुरू करणे. या आजारात मल्टिडिसिप्लिनरी ॲप्रोच लागतो, म्हणजे इएनटी सर्जन, ओरल सर्जन, आयसियू युनिट, पोस्ट ऑपरेटिव रिहॅबिलेशन, इत्यादी
● ऑपरेशन करून खराब झालेल्या हाडाचा भाग काढून टाकावा लागणे, जंतुसंसर्ग डोळ्यांत पसरल्यास पूर्ण डोळा काढून टाकणे हाही उपचार आहे.
● उपचारास विलंब लागल्यास दृष्टी जाऊ शकते, नाक व जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास मृत्यूची शक्यता पन्नास टक्के असते. असा सिडीसी (सेंटर ऑफ डिसिझ कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शन) यांचा अहवाल आहे.
काय बाळगावी सावधगिरी ?
● अशी लक्षणे आढळून आल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टर्स जसे की, कान, नाक, घसा तज्ज्ञ/डेंटल सर्जन/नेत्ररोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेवून पुढील उपचार सुरू करावेत.
● हे उपचार खर्चिक आहेत पण मोठ्या शहरांमध्ये जसे की पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे यांचे खास 'म्युकरमायकोसीस क्लिनिक'सुद्धा आहेत, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे.
● शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, निरोगी जीवनशैली अवलंबणे.
● रस्त्याचे खोदकाम किंवा ओल्या मातीचे खोदकाम अशा ठिकाणी जाणे टाळावे, कारण ही बुरशी निसर्गातूनच आढळून येते. फ्रिजमध्ये खूप दिवसांचे अन्न जमा करणे अशा गोष्टी टाळाव्या, भिजलेले लाकूड किंवा बुरशी आलेले ओले फर्निचर घरातून काढून टाकावे.
● मास्क लावणे, सॅनिटायझेशन करणे या गोष्टीही नियमित सुरू राहू द्याव्या.
हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले
हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती