नांदेड- कंधार लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी कंधार शहरात वंचित बहुजन आघाडीने रास्तारोको आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कंधार लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी - वंचित बहुजन आघाडी आंदोलन नांदेड
कंधार लोहा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामावरच अवलंबून असतात. मात्र, यावेळी परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हाताला आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
कंधार लोहा तालुका हा पूर्णतः डोंगराळ भाग आहे. केवळ पावसाच्या पाण्यावरील पिके या तालुक्यात घेतले जातात. खरीप हंगामावरच शेती व्यवसाय अवलंबून असल्याने शेतकऱ्यांची सर्व दारोमदार ही खरीप हंगामावंरच असते, मात्र यावेळी परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हाताला आलेला सोयाबीन, कापूस, तूर, मूग हे पीक वाया गेले असून शेतकरी कमालीचा तणावग्रस्त आहे. त्यामुळे लोहा कंधार-तालुक्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी केली आहे. शिवा नरंगले यांच्या नेतृत्वात सोमवारी कंधार येथे महाराणा प्रताप चौक या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्यात यावा यासह आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाम कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे, भीमराव बेंद्रिकर, पांडुरंग ढवळे, संतोष पाटील गवारे, संजय निळेकर, भास्कर कदम, बबन जोंधळे, विहान कदम, सर्जेराव कांबळे, प्रेमानंद गायकवाड, विश्वंभर डुबुकवाड, सुशील ढवळे, संभाजी कांबळे, माणिक ढवळे, चंद्रशेखर गायकवाड यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.