नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी पितापुत्राचा मृत्यू - पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आरळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील शेतकरी पिता-पुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नांदेड- नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बिलोली तालुक्यातील आरळी येथील शेख शादूल महेबूब व त्याचा मुलगा मेहराज शादुल यांचा सोमवारी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बिलोली तालुक्यातील आरळी येथील शेतकरी शेख शादुल महेबूब ( वय - 35 ) मुलगा शेख मेहराज शादुल ( वय - 16 ) हे सोयाबीन काढण्यासाठी सोमवारी शेताकडे जात असताना वाटेत असलेल्या नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुलगा पाण्यात बुडाला. मुलाला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी शेख शादुल सुद्धा पाण्यात उतरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असफल झाले. यामुळे पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
ही घटना समजताच गावातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. यातील तरुण युवक मनोज पाटील बोडके, राजेश चंदावार, उमाकांत बोडके यांनी केलेल्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाळात रुतलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . दरम्यान, शेख शादुल महेबूब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.