नांदेड - धर्माबाद बाभळी बंधाऱ्याच्या 'बॅकवॉटर'मुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु, आठ वर्षे उलटूनही शासनाने पिकांचा मावेजा दिला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे छावा संघटनेने प्रशासनास दिला आहे.
२२५ कोटी रुपये खर्च करून मोकळी, रत्नाळी, बाभळी, शेळगाव (ध), माष्टी, पाटोदा (बु), पाटोदा बाभळी येथे शासनाने बाभळी बंधारा बांधला. परंतु, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. उलट बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे तालुक्यातील (खु)पाटोदा (थडी)जारीकोट, चोंडी, दिग्रस, चोळाखा, अटाळा व नदीकाठच्या इतर गावातील ३०० हेक्टर शेती बाधित झाली आहे. यासाठी सन २०१२ मध्ये शासनाकडून भूसंपादन व पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या शेतीचे सर्वे करण्यात आले होते. सर्वे होऊन आठ वर्षे उलटले आहेत. परंतु, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत मावेजा मिळाला नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत राहिले. या प्रकरणांची दखल संबंधित विभाग घेत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.