नांदेड - गत आठवड्यापासून माहुर तालुक्यात परतीच्या पावसाने रिमझीम सुरुवात केली होती. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट असून बळीराजावर आर्थिक नुकसानीचे संकट कोसळले आहे. तरी, शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
माहूर, किनवट तालुके हे डोंगराळ भागात वसले असून येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्यात शेती पुरक उद्योग व्यवसायाला चालना देण्यास प्रशासन उदासीन असल्याने आणि शेतीला जोड धंद्याची साथ नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. तर, तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अल्प असून तीही हंगामी आहे. त्यामुळे शेतकरी यांची भिस्त केवळ निर्सगावर अवलंबून असलेल्या खरीप हंगामावरच विसंबून आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून पीके ऐन उमेदीत असतानाच निसर्गाच्या प्रकोपामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी डबघाईला आला आहे. या चालू वर्षात सुरुवातीला पाऊस समाधानकारक पडत असल्याने सुगीचे दिवस येतील, अशी आशा बळीराजास वाटत होती. मात्र, मागच्या आठवड्यापासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कापणीस आलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगाना अंकुर फुटले असून वेचणीस आलेल्या कापसाच्या पिकास मोड फुटत आहेत. तर, परीपक्व बोंडे अती पावसामुळे खराब होत आहेत. त्यामुळे खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट येऊन प्रचंड नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या सणावर आलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे दिवाळे काढले असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच तत्काळ नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मजुरांची उपासमार -