नांदेड -लॉकडाऊनच्या काळात केळीला 300 ते 400 रुपये क्विंटल दर मिळत होते. मधल्या काळात केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली आहे. आता पुन्हा केळीला 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचे ग्रहण अद्यापही सुटलेले नसल्यामुळे केळीचे घड फेकून देण्याची वेळ आली आहे.
केळी उत्पादक शेतकरी आपली व्यथा मांडताना. जिल्ह्यातील अर्धापूरसह परिसराला केळी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे या भागात 80 ते 90 टक्के शेतकरी केळी पिकाची लागवड करतात. रात्रंदिवस कष्ट करून लाखो रुपये खर्च करून केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, केळीचे घड कापणीस सुरुवात झाल्यापासून केळीच्या दराला घरघरच लागली आहे.
मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे केळीला कवडीमोल भाव मिळाला. लॉकडाऊनच्या काळात केळीला 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होते. मधल्या काळात केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली. पुन्हा केळीला 400 ते 500 रुपये दर मिळत आहे. नांदेड येथील केळी बाजारात 15 ते 20 किलोचा घड चक्क 10 रुपयात विकला जात आहे. तर काहींना फेकून देण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी नवरात्रौत्सवाच्या काळात केळीच्या दरात वाढ होत होती. मात्र, यंदाच्या या काळात केळीच्या दराने निच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून केळीची जोपासली. मात्र, यंदा केळी या पिकावर मोठे संकट आले आहे. यावर्षी कोरोना संकटाने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. व्यापारी कोरोनाचे निमित्त साधून केळी ही कवडीमोल दरात विकत घेत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यातील केळी प्रामुख्याने दिल्ली, चंदीगड, हरियाणा, मथुरासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जाते. त्याचबरोबर विदेशातही अर्धापुरच्या केळीची चव घेतली जाते. यंदा या भागात कोरोना, अतिवृष्टी, वादळवारे, करपा रोग आदींचे निमित्त साधून केळीचे दर कमी करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे केळीला रोगाची लागण झाल्याने केळी पिकण्यास सुरुवात झाली आहे. केळीचे घड झाडावरच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच व्यापारी केळीची खरेदी करीत नसल्याने दिवसरात्र कष्ट करून भरघोस उत्पन्न मिळण्याच्या आशेवर लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतात केळी खराब होत आहे. तर दुसरीकडे बाजारात कवडीमोल दर मिळत आहे यंदातर केळी शेताच्या बाहेर काढणेसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. व्यापारी मनभाव केळी खरेदी करीत असल्याने केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. तोंडाला आलेला घास शेतातच नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.