नांदेड- कोव्हिड मोटारसायकल, ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात केल्यामुळे कोव्हिड पेट्रोलिंगमुळे कंटेनमेन्ट झोन मध्ये लागणारा पोलीस बंदोबस्त कमी होऊन पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू संक्रमणातून बचाव होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी, कर्मचारी संक्रमित होऊ नये या दृष्टिकोनातून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटार सायकलवर कोव्हिड पेट्रोलिंगची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करून पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन बोलत होते.
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले, या कोव्हिड पेट्रोलिंगमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असून ही मोटारसायकल कंटेनमेन्ट झोनमध्ये पेट्रोलिंग करुन जनतेमध्ये कोरोना विषाणू संदर्भाने जनजागृती करतील व कोणीही घराबाहेर निघणार नाही. याबाबत पेट्रोलिंगदरम्यान लक्ष ठेवतील. कोव्हिड पेट्रोलिंगसाठी प्रायोगिक तत्त्वावर सध्या 10 मोटार सायकली सुरू करण्यात आली असून लवकरच ़ नांदेड शहरात कोव्हिड पेट्रोलिंगसाठी सुसज्ज अशा एकूण 32 मोटारसायकली सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने कंटेनमेन्ट झोनमध्ये जनतेवर नजर ठेवून विनाकारणबाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडिओ चित्रीकरण व फोटो काढणार आहे. कोव्हिड पेट्रोलिंग व ड्रोनमुळे पोलीस दलावरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार असल्याचे सांगितले आहे. मोटारसायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे.
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाननगर, अबचलनगर, गुरुद्वारा परिसर व रहमतनगर, रविनगर कौठा, सिध्दार्थनगर करबला येथे कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळल्याने हे ठिकाणे व लगतचा परिसर हा नगरपालिका आयुक्त यांनी पूर्णत: सील करुन कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नांदेड शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच कोरोना विषाणूने पोलीस अधिकारी व कर्मचारी संक्रमित होवू नये या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे संकल्पनेतून नांदेड शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये मोटारसायकलवर कोविड पेट्रोलिंगची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच मोटारसायकल पेट्रोलिंगसोबतच कंटेनमेन्ट झोनमध्ये आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाईल.