नांदेड -बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तामसा शहरातील एका 9 वर्षीय चिमुकलीवर 10 सप्टेंबर 2017 मध्ये लैंगिक अत्याचार झाला होता.
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला पाच वर्षाची सुनावली शिक्षा हेही वाचा - साळशिंगेतील हत्येप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक
पीडिता सायंकाळी शाळेतून घरी निघाली होती. वाटेतच पीडिता दप्तर धुण्यासाठी नाल्यावर थांबली असता, आरोपीने तिची छेड काढली व अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपी राजू सोनटक्के (वय-22) हा घटनेनंतर फरार झाला होता.
पोलिसांनी कलम 354, अॅट्रॉसिटी कायदा, पोक्सो कलम 8 व 10 अन्वये तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास भोकरचे तत्कालीन उपाधीक्षक डी. एम. वाळके यांनी केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सहा साक्षीदार तपासून जिल्हा सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी 15 नोव्हेंबर रोजी आरोपी राजूला पोस्को कायदा कलम 10 अन्वये दोषी ठरवत 5 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एम. ए. बत्तुल्ला डांगे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एम. चंदापुरे यांनी मदत केली.
हेही वाचा - पतीने केली पत्नी व मुलाची गळा आवळून हत्या; कारण अस्पष्ट