नांदेड -आरोग्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना नांदेडात घडली आहे. खुद्द लोकप्रतिनिधीनेच श्यामनगर येथील महापालिका रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधीनेच केली आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण
कोरोनाच्या महामारीत आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत देखील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपले काम करत आहेत. तरीदेखील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी होताना दिसत नाहीत. नांदेडात नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लसीकरणावरून झाला वाद
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा लसीकरणावर भर देत आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. मात्र नांदेडमध्ये कोरोना लस दिली जात नसल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या नगरसेवकाने आरोग्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. ही धक्कादायक घटना काल शहरातील श्यामनगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात घडली आहे. मारहाणीची घटना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लस घेण्यासाठी नागरिक रांगेत थांबले आहेत, लस का दिली जात नाही? असा प्रश्न करत नगरसेवक पिंपळे यांनी आरोग्य कर्मचारी सुरेंद्र तळेगावकर यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना मारहाण देखील केली असून, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नगरसेवकाची आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलनाचा इशारा
श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा येथील कर्मचाऱ्यांनी दिला होता. दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -गोव्यात म्युकरमायकोसिसने एकाचा मृत्यू; आणखी 6 जणांना लागण