नांदेड- राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना महामारीमुळे मनपात देखील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण आले होते. परंतु मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी 18 मेपासून मनपात सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार कर्मचारी रुजू झाले, मात्र तीन कर्मचारी मास्कविना काम करत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्त लहाने यांनी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला.
मास्क न वापरणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका, ठोठावला 'इतका' दंड - कोरोना महामारी नांदेड
तीन कर्मचारी मास्कविना काम करत असल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्त लहाने यांनी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला. त्यानंतर इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लगेच आपल्या तोंडाला रुमाल, मास्क बांधून खबरदारी घेतली.
कोरोना महामारीचे संकट ओढवल्यापासून विविध शासकीय कार्यालयांप्रमाणे मनपातही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आली होती. त्यानुसार सुरुवातीला 5 टक्के, नंतर 10 टक्के व 16 मेपर्यंत 35 टक्के कर्मचारी मनपात कामावर होते. शनिवारी मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी एक आदेश काढून सोमवार 18 मे पासून 100 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे बजावले होते. त्यानुसार सोमवारी लहाने यांनी आपल्या कक्षात आल्यावर मनपाच्या मुख्य इमारतीत एक फेरफटका मारला. कोणत्या विभागात किती अधिकारी, कर्मचारी आलेत याची त्यांनी माहिती घेतली. तेव्हा विद्युत विभागात एक व आवक जावक विभागात दोन कर्मचारी विना मास्क काम करत असल्याचे आयुक्त लहाने यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ या तिघांनाही प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला.
ही कारवाई होताच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लगेच आपल्या तोंडाला रुमाल, मास्क बांधून खबरदारी घेतली. तसेच आयुक्तांच्या या फेरीत अनेक जण गैरहजरही आढळून आले. विशेष म्हणजे काही कर्मचारी लॉकडाऊनपूर्वीच रजेवर गेले होते. त्यापैकी अनेक जण कामावर परतले नसल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर आयुक्त आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.