नांदेड - जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एस. बारगळ यांना शहरातील एका लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांशी कोणतीही परवानगी न घेता काही दिवसांपूर्वी ते पुण्याला गेले होते. त्यामुळे विनापरवानगी पुण्याला प्रवास करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता 'क्वारंटाईन' हेही वाचा...'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानंतर बारगळ यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. कोरोना आजाराच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिऱ्यांसह आरोग्य विभाग तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. जिल्ह्यात आपतकालीन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे अशा प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता नांदेड ते पुणे असा प्रवास केला. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटून ते सोमवारी (दि.१३) नांदेडला परतल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून बारगळ यांचा पदभार तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांच्याकडे सोपवला आहे.
हेही वाचा....कोरोनासाठी 'या' थेरपीचा उपयोग... 3 ते 7 दिवसांत रुग्ण होतो बरा
सोमवारी दुपारीच शाह यांनी पाणीपुरवठा विभागाचा एकतर्फी पदभारही स्वीकारला. याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, पुण्याहून परतल्यानंतर बारगळ यांना ते सध्या वास्तव्यास असलेल्या शहरातील एका लॉजमध्येच १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. सामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांनाही आता कोरोनाची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच कायद्याची पायमल्ली करण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे बारगळ यांना पुण्याला जाणे चांगलेच महागात पडले आहे.