नांदेड - विदर्भातील अमरावतीत कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे विदर्भातून मराठवाड्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर माहूरजवळ तपासणी छावणी लावण्यात आली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास मराठवाड्यात प्रवेश दिला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे ही तपासणी छावणी उघडण्यात आली असून तिथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून हे पाऊल उचलले आहे.
विदर्भातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी; माहूरजवळ उभारली छावणी...! सोळा तालुके, विस्तीर्ण क्षेत्रफळ...! सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना हाती घेतला असून आता नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सीमेवर तपासणी छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येकाची अँटीजन चाचणी...!
यवतमाळसह विदर्भातील जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जे प्रवासी नांदेड जिल्ह्यात येत आहेत, त्यांची या छावणीत अँटिजन कोरोना चाचणी केली जाईल. जे बाधित आढळतील, त्यांना उपचारासाठी ते जेथून आले आहेत, तेथेच पाठविण्यात येईल व ज्यांचे अहवाल बाधित आले नाहीत, त्यांना प्रवेश दिला जाईल. यामुळे बाधितांवर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल. या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले .
'मी जबाबदार' या कर्तव्याच्या भावनेतून काळजी घ्यावी
माझे कुटुंब माझी जबाबदारीसमवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मी जबाबदार कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधून नांदेड जिल्हावासियांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नियमांचा भंग करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करणार....!
प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर, निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जनतेने प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट करून नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.