नांदेड- जेवण झाले की अनेकांना पान खाल्ल्याशिवाय जेवण झाल्याचे समाधानच वाटत नाही. पण या पानाचा विडा मात्र लॉकडाऊनमुळे रंगतच नाही. कोरोनाचा फटका इथेही बसल्याची खंत पान उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. उन्हाळयात पान वेलीच्या मळ्यातून भरघोस उत्पन्न मिळत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्याने पान वेलीच्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जिल्ह्यातील चाभरा (ता.अर्धापूर) येथील शंकरराव मरकुंदे यांनी दोन एकर क्षेत्रावर पान नागवेलीची लागवड केली आहे. नागवेलीपासून वार्षिक लाखो रुपयांचा फायदा होतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्याने बाजारपेठा बंद आहेत. शंकरराव मरकुंदे यांनी दोन एकर क्षेत्रात कपुरी जातीच्या पानवेलीची लागवड केली आहे. कपुरी पानाला श्रीरामपूर, परभणी, जळगाव, नाशिक अशा मोठ्या शहरात मागणी असते. कोरोना विषाणूच्या भीतीने सर्व बाजारपेठा बंद असल्याने पानांची मागणीच होत नाही. त्यामुळे कुठलीच विक्री नाही.