अतिगंभीर कोरोनाबाधितांना रुग्णालयातील खाटांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष...! - नांदेड कोविड नियंत्रण कक्षाचा नंबर
कोविड रुग्णालयात भीती पोटी काही रुग्णांनी गर्दी केल्याने अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाट मिळणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसह जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
![अतिगंभीर कोरोनाबाधितांना रुग्णालयातील खाटांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष...! नांदेड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11318416-199-11318416-1617812013948.jpg)
नांदेड- मागील काही आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या दररोज हजारापेक्षा अधिक होत आहे. यात काही जणांची प्रकृती ही केवळ विलंबाने तपासणी व दुखणे अंगावर काढत असल्यामुळे अतिगंभीर होत आहे. ज्यांनी लवकर तपासणी करून घेऊन प्राथमिक स्तरावरच बाधा असल्याचे माहिती करून घेतले आहे, अशा बाधितांना गृह विलगीकरण अथवा जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कोविड केंद्रामध्ये उपचार घेतले ते पुरेसे ठरतात. मात्र, जे अतिगंभीर कोविडबाधित आहेत, अशा रुग्णांना रुग्णालयामध्ये ऑक्सिजनसह इतर उपचारांची तत्काळ गरज भासते. कोविड रुग्णालयात भीती पोटी काही रुग्णांनी गर्दी केल्याने अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाट मिळणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसह जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या क्रमांकावर संपर्क साधावा...!
जे रुग्ण अतिगंभीर नाहीत, ज्यांनी लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून शासनाच्या सूचनेनुसार विलगीकरण अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले आहेत, त्यांच्या तब्येती अधिक खालावलेल्या नाहीत. गृह विलगीकरण आणि कोविड केंद्रात उपचारावरच ते बरे होऊन परतले आहेत. मात्र, ज्यांनी अधिक काळ उपचार न घेता दुखणे अंगावर काढले आहे त्यांनी स्वत: प्रकृतीला धोक्यात आणले आहे. अशा अतिगंभीर कोविडबाधित रुग्णांवर तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने शासकीय आणि खासगी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची आवश्यक ती माहिती त्यांना मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 तास कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात आले आहे. या कोविड नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून संपर्क साधावयाचा असल्यास 02462 (235077) या क्रमांकावर संपर्क साधावा.