नांदेड - केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी दिल्ली येथे देशातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या लढ्यातील शेतकरी बांधवांना पाठिंबा म्हणून काँग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते. मात्र, कंधारमध्ये हे आंदोलन एका तासातच गुंडाळण्यात आले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी कंधार कॉग्रेसच्यावतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या दुफलीमुळं हे आंदोलन तासभरातच उरकावं लागलं. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचे निवेदन दिले खरे. परंतु काँग्रेसचे नेते आले आणि निवेदन घेऊन गेले. एक दिवशीय धरणे आंदोलन दिवसा ऐवजी एका तासातच करुन गेले असल्याने या धरणे अंदोलनाचा फज्जा उडाला असल्याचे बोलले जात आहे.
एका तासातच गुंडाळले आंदोलन
तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे वजन पाहिले तर बिना कार्यकर्ता नेता अशी अवस्था आहे. तालुक्यातील काँग्रेस नेत्यांचा अहंकार आणि मीपणामुळे पक्षातील नेत्यांमध्ये एकमत राहिले नाही. त्यामुळे सर्वच निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. लोहा कंधार तालुक्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या की काँग्रेस पक्षाचे नेते हेच एकमेकांचे पाय ओढत असल्याचे पाहायला मिळते. परिणामी निवडणुकीतील पराभवाला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे.