नांदेड - जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. आता नायगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने दुसऱ्या चव्हाणांचा पराभव करू असे भाजपने जाहीर केले होते. गेल्या ५ वर्षापूर्वी पराभव होऊनही राजेश पवार हे जनतेच्या संपर्कात राहीले. याच जनसंपर्काच्या बळावर भाजपने मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली. तब्बल ५४ हजार ३८४ मतांनी पराभव करत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांची हॅट्रीक पवारांनी रोखली.
जिल्ह्यातील महत्वाचा असा मतदारसंघ म्हणून नायगाव मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात नायगाव, उमरी, धर्माबाद हे ३ तालुके येतात. २०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून अचानकपणे राजेश पवार हे मैदानात उतरले. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. यात काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांना ७१ हजार २० मते होती. तर भाजपचे राजेश पवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ५० हजार ५९५ इतकी मते पडली आणि राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांना ५७ हजार २४७ इतकी मते पडली होती.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला, तर शिवसेनेची पिछेहाट...!
नायगाव मतदारसंघात या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडून त्या भाजपचे राजेश पवार यांना लाभाच्या ठरल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भोकर मतदारसंघातून निवडणूक लढविली. तर, संपूर्ण राष्ट्रवादीची टीम या मतदारसंघात भाजपमध्ये आल्यामुळे राजेश पवार यांचे बळ दुप्पट वाढले. प्रचाराच्या बाबतीतही ते कुठेच कमी पडले नाहीत, निवडणुकीसाठी लागणारी प्रत्येक यंत्रणा त्यांनी कामी लावली. तर, दुसरीकडे गेल्या १६ वर्षांपासून काँग्रेसचे आ. वसंतराव चव्हाण यांच्या ताब्यात हा भाग असल्यामुळे त्यांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण तयार झाले. त्याचा फटका काँगेसला बसला. साध्या मूलभूत गरजादेखील ते पूर्ण करू न शकल्याची टिका मतदार करत होते. त्यातच राजेश पवार मात्र पराभव होऊनही ५ वर्षे जनतेच्या संपर्कात राहीले. टँकरने पाणी पुरवठा, गावोगावी निधी देणे, विविध सामाजिक उपक्रम राबविणे आदीमुळे त्यांना मतदारांचा कौल मिळाला.