नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड येथे भारतीय जनता युवा मोर्चाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यातील सोशल डिस्टन्सवरून काँग्रेस आणि भाजपमधील पॉलिटिकल डिस्टन्सी वाढली आहे. शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमावर कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत महामारी कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. तसेच खासदारासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही कॉंग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसने तक्रार दाखल केल्यानंतर भाजपनेही आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सामाजिक काम काँग्रेसच्या डोळ्यात खुपत असून काँग्रेसची अवस्था ही 'नाचता येईना अंगण वाकडं' अशी झाल्याचे भाजपने म्हटले आहे. कोरोनाच्या महामारीत काँग्रेस आणि भाजपच्या या 'राजकीय डिस्टन्स' ची चर्चा मात्र जिल्ह्यात होऊ लागली आहे.
काँग्रेस व शिवसेनेकडून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात-सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत महामारी कायद्याचे उल्लंघन करणारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच रक्तदान शिबिराचे संयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलोकर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वभर पवार, शहरप्रमुख सचिन चंद्र यांच्यासह अनेकांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रपान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार भाजपच्यावतीने मुदखेड येथील गणपती मंदिरात मंगळवार १६ जूनला रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी रक्तदान करणारे कमी व हौशी लोक जास्त अशी स्थिती होती. हे रक्तदान शिबीर बेकायदेशीर होते. तसेच हौशी लोकांची गर्दी झाल्याने अन्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पाटील गोजेगांवकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.