नांदेड:एकनाथ शिंदेंनी 40 आमदार फोडून राजकीय भूकंप घडवला आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. काँग्रेस नेते अशोक चव्हाणंही मोठा धमका करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. भाजप समन्वयक आशिष कुलकर्णींच्या घरी, चव्हाण आणि फडणवीसांची भेट झाली तेथे त्यांची 15 ते 20 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये येणार का अशी चर्चा सुरु झाली. इतकेच नाही तर काँग्रेसचा एक गटच भाजपच्या संपर्कात असल्याचेही बोलले जातेय. मात्र या भेटीचा स्वत: देवेंद्र फडणवीसांनी इन्कार केलाय.
दिल्लीतल्या काँग्रेसच्या रॅलीत फडणवीस किंवा भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याशी माझी भेट झालेली नाही. मी शनिवारी दिल्लीतल्या काँग्रेसच्या रॅलीत सहभाग घेणार आहे. असे चव्हाणही सांगत आहेत. तसेच दिल्लीत झालेल्या काॅंग्रेसच्या आजच्या आंदोलनात अशोक चव्हाण हे प्रामुख्याने समोर दिसले. शिवाय काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही या वृत्ताचा इन्कार केला आहे आणि यात कसलेही तथ्य नसल्याचे सांगत माध्यमांनी अशा चर्चा घडवुनये असे स्पष्ट केले आहे मात्र अजुनही या विषयावर पडदा पडलेला नाही.
मोदी लाटेतही झाले खासदारअशोक चव्हाण 5 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये आदर्श सोसायटीत नातेवाईकांच्या फ्लॅट दिल्याच्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2014 च्या मोदी लाटेतही ते खासदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये चव्हाणांनी पुन्हा भोकर मतदारसंघातून विधानसभा लढवली आणि आमदार झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री राहीले.
बहुमत चाचणीपासून दूर चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज आहेत, अशी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहेच. शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही अशोक चव्हाण उशीरा आले त्यामुळे ते मतदान करु शकले नाहीत. यावरुन अशोक चव्हाणांना पक्षाने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती फक्त अशोक चव्हाणच नाही तर आणखी 4 ते 5 आमदारही बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अदृश्य हातांचा पाठींबा म्हणत, आभार मानले होते.