नांदेड - चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा नांदेडमध्ये एक संशयित रुग्ण आढळला. संशयित रुग्णावर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
नांदेड येथील रहिवासी असलेला हा संशयित रुग्ण काही कामासाठी चीन येथे गेला होता. चीनमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चीनमधून भारतात दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी केली जात आहे. नांदेडच्या संशयित रुग्णाचीही विमानतळावर तपासणी झाली. त्यावेळी तो कोरोना निगेटिव्ह आढळून आला. मात्र, घरी परतल्यानंतर त्याला सर्दी, खोकला व घशाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो स्वत: मंगळवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल झाला.